Karjat: शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगने प्रशासनाचे वाभाडे; नाशिकसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, विरोधक आक्रमक!
ताज्या बातम्या वाहतूक

Karjat: शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगने प्रशासनाचे वाभाडे; नाशिकसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, विरोधक आक्रमक!

Aug 10, 2026

कर्जत १०: महाराष्ट्रातील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुरावस्थेचा फटका केवळ वाहनचालकांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि शाळकरी मुलांनाही बसत आहे. या परिस्थितीवर बोट ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी एक अनोखा आणि उपरोधिक व्हिडिओ बनवला आहे. यात हातात छत्री धरून ‘रिपोर्टर नेहा घारे’ आणि ‘कॅमेरामन मानसी पवार’ बनलेल्या या मुली रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आणि खड्ड्यांचे वर्णन अगदी गमतीशीरपणे करताना दिसतात. “हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा आहे, गाड्या एवढ्या गुळगुळीत जात आहेत की पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. दुसरीकडे, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. विशेषतः नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून तिथे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेत या मुद्द्यावरून विशेष महासभा वादळी ठरली होती. आता याच प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुढील आठ दिवसांत महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे.

केवळ नाशिकच नव्हे, तर पालघर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये रस्त्यांची अशीच चाळण झाली आहे. दुचाकीस्वारांचे थोडेसे दुर्लक्षही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी खड्डे बुजवा-बुजवी केली जात असली, तरी पहिल्याच पावसाच्या सरींमध्ये हे रस्ते पुन्हा उखडतात. निकृष्ट दर्जाचे काम, कंत्राटदारांचे दुर्लक्ष आणि त्यामागे असलेला भ्रष्टाचार यामुळेच दरवर्षी नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *