Maharashtra Cabinet decision: तुकाराम मुंडे इफेक्ट…राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करण्याचे लक्ष्य!
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet decision: तुकाराम मुंडे इफेक्ट…राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करण्याचे लक्ष्य!

Sep 1, 2026

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याचा विकास, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना गती देणारे ४ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळमाफिया आणि शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनवर धडक कारवायांचा बडगा उगारला होता. या ‘मुंडे इफेक्ट’ची स्पष्ट छबी आज मंत्रिमंडळाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये पाहायला मिळाली.

२०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करणार

‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या धर्तीवर राज्याला २०२९ पर्यंत अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. यासाठी ‘Whole-of-Government Approach’ (सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन) हे नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून ड्रग्ज आणि अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली जाणार आहे.

शासकीय कार्यक्रमांत आता आरोग्यदायी मेन्यू

शासकीय व निमशासकीय बैठका, विविध कार्यक्रम आणि सरकारी उपाहारगृहांमध्ये (कॅन्टीन) यापुढे फक्त आरोग्यदायी अन्नपदार्थ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जंक फूडला फाटा देत संतुलित मेन्यू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे या धोरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सोलापूर उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या (राष्ट्रीय महामार्ग ६५) उन्नत मार्ग प्रकल्पाचा अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून दर्जा देण्यात आला असून, यामुळे आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) वर्ग करण्याची प्रक्रिया जलद होणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून तब्बल १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह संबंधित भागातील सिंचन व्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयांमुळे अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळ मिळण्यासोबतच सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सिंचन क्षेत्रातही महत्त्वाची पावले पडणार आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *