मुंबई २८ : मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरवाजात उभे राहण्याच्या किरकोळ वादावरून हा जीवघेणा हल्ला झाला.नालासोपारा येथे राहणारा २४ वर्षीय तौसिफ शेख हा सुतारकाम करतो. मंगळवारी रात्री सुमारे ८:४१ वाजता तो त्याचा सहकारी हुसेन अली याच्यासोबत गोरेगाववरून विरारच्या दिशेने जाणारी धीमी लोकल पकडून दरवाज्या जवळ उभा होता. कांदिवली स्थानकात राहुलकुमार पांडे (वय ३०) नावाचा प्रवासी त्याच डब्यात चढला.लोकल बोरीवलीच्या दिशेने जात असताना गर्दी होऊ नये आणि इतर प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून तौसिफने राहुलकुमारला आत सरकण्यास सांगितले.
यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला आणि नंतर झटापट झाली. हुसेन अलीने मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण वाद वाढतच गेला. बोरीवली स्थानकातून ट्रेन सुटत असताना राहुलकुमारने रागाच्या भरात तौसिफच्या पाठीवर जोरात लाथ मारली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तौसिफचा तोल गेला आणि तो थेट धावत्या लोकलवरून खाली पडला.तौसिफ गंभीर जखमी झाला असून त्याला बोरीवली स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात प्रथमोपचार देऊन कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. तौसिफचा मोबाईल खराब असल्याने आणि तो वेळेत घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंतेत होते; अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याच्या आईला तो रुग्णालयात असल्याचे समजले.
घटनेनंतर तौसिफचा साथीदार हुसेन अली याने आरोपी राहुलकुमार पांडेला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या राहुलकुमारला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.एकाच आठवड्यातील अशी ही दुसरी गंभीर घटना आहे. मागील आठवड्यातही वांद्रे-माहिमदरम्यान दिव्यांगांच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका ६५ वर्षीय वृद्धाला धक्का देण्यात आला होता, ज्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लोकल प्रवासादरम्यान क्षुल्लक वादातून होणाऱ्या या हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे!
