Mumbai news : अमूल व गोकुळच्या नावाखाली दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ: कांदिवलीतून आरोपीला रंगेहाथ अटक, ७४ लिटर बनावट दूध जप्त!
मुंबई १४ : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात नामांकित कंपन्यांच्या दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते दूध ग्राहकांना विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. ईरन्ना लिंगय्या गोपनाबोनई (वय ४८, रा. रामउजागर चाळ, लक्ष्मीनगर, दामुनगर लास्ट बस स्टॉप, कांदिवली पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी आपल्या राहत्या घरात अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून ते ग्राहकांना विक्री करणार असल्याची गुप्त माहिती समतानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ५:५० वाजता आरोपीच्या घरावर छापा टाकला.
यावेळी आरोपी अमूल आणि गोकुळ कंपनीच्या एक लिटर तसेच अर्धा लिटरच्या दुधाच्या पॅकेटमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता, तेथे ७४ लिटर भेसळयुक्त दूध, दूध भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या नावाच्या बनावट रिकाम्या पिशव्या हस्तगत करण्यात आल्या. अशा प्रकारे नामांकित ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून भेसळयुक्त दूध बाजारात विकण्याचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७४, ३४५(३), ३४७(१), ३१८(४), ३३६(३), ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त (उत्तर परिमंडळ-३) गजानन शिवलिंग राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (समतानगर विभाग) कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडीत व तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक धनंजय कावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ भोये, सहाय्यक फौजदार राजेश तोंडवळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, पोलीस हवालदार अतुल ननवरे, पोलीस शिपाई दौलत साळुंके, पोलीस शिपाई निलेश भिकले आणि पोलीस शिपाई अशोक गाढवे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत!
