Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, शासनाची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, यापूर्वी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वेतन प्रक्रिया हाताळणाऱ्या काही आजी-माजी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिस दलाच्या यादीत प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या आठ ते दहा व्यक्तींची नावे समाविष्ट केली.
त्यानंतर बनावट नोंदींच्या आधारे या व्यक्तींचे वेतन नियमितपणे काढण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणात पोलीस विजया चव्हाण आणि अमोल मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बनावट पोलीस सर्व्हिस आयडी आणि डीसीपीएस आयडी तयार करून त्याच्या आधारे वेतन मंजूर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.प्राथमिक माहितीनुसार, २०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती लेखा विभागाकडे पाठविताना या बनावट नोंदी घुसवण्यात आल्या. नव्या संगणकीय प्रणालीमध्ये माहिती अद्ययावत करताना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर झालेल्या तपासात शासनाच्या तिजोरीतून अतिरिक्त साडेसहा कोटी रुपये वेतनाच्या स्वरूपात काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
