Mumbra: ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी … पैगंबर मोहम्मद यांच्या संदेशांचे फलक; मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना!
ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्ये, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र, सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे. जगात जे सुरू आहे; ते थांबावे आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी, या सद्हेतूने ठामपाचे विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी या मानवी साखळीचे आयोजन केले होते.
वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाहचा आदर करण्यासारखे आहे, तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतो, अल्लाहच्या नजरेत महिला पुरूषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल, खोटे बोलणे तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल, आदी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो अबाल वृद्ध, महिला, तरूण दारूल फलाह मशिदीसमोरील मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विरोधी पक्ष नेते शानू पठाण म्हणाले, आम्ही हा संदेश मानवी साखळी द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडत आहोत, की आज जगात जे द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका इराणशी लढत आहे, रशिया युक्रेनशी लढत आहे. संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणात, या परिस्थितीत आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणे आवश्यक आहे की, माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे.
आम्ही हातात पकडलेल्या फलकांवर, अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही, तर तुमच्या कर्मांकडे आणि तुम्ही लोकांसोबत कसे वर्तन करता, त्याकडे पाहतो. हा प्रेषित पहात आहेत, असे संदेश लिहिले आहेत. आजच्या मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गोष्टी जगात पोहोचवायच्या आहेत आणि एक माध्यम तुम्ही आहात, ज्यांच्याद्वारे आजच्या दिवशी जगात प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी, प्रेमाचा संदेश आणि शांततेचा संदेश जगात पोहोचवावा, आणि आपल्या देशात, जगात आणि आपल्या राज्यात भाईचारा, बंधुभाव आणि प्रेम-मोहब्बत नेहमी कायम राहावी, हाच हा संदेश आहे, असेही पठाण यांनी सांगितले.
या प्रसंगी नगरसेविका मर्जिया पठाण यांनी, प्रेषिताने सांगितलेल्या मार्गावर चालणे हेच पुण्यकर्म आहे. आपले कुटुंब, समाजात कसे वागावे, हे प्रषिताने सांगितले आहे. त्यांची हीच शिकवण आम्ही गेली पाच वर्षे या कार्यक्रमाद्वारे पोहचवित आहोत. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्याचसाठी ही मानवी साखळी करण्यात आली होती, असे सांगितले!
