Narendra Modi: ‘मी काही बाबा बागेश्वर नाही…’; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिश्किल टिप्पणी!
न्यूज

Narendra Modi: ‘मी काही बाबा बागेश्वर नाही…’; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिश्किल टिप्पणी!

Aug 9, 2026

नवी दिल्ली ०९ :आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीने सभागृहात हलके-फुलके वातावरण निर्माण झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, आज दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याबाबत काही ना काही विचार नक्कीच सुरू असतील. मी काही ‘बाबा बागेश्वर’ नाही, जे तुमच्या मनातील सर्व ओळखू शकेन; परंतु तुमच्यापैकी प्रत्येकाकडे भविष्याबाबत एक स्पष्ट दृष्टी आणि वेगळे स्वप्न नक्कीच आहे, याची मला जाणीव आहे.आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ध्येयांवर प्रकाश टाकत पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज इथे बसलेला एखादा विद्यार्थी आपल्या पहिल्या नोकरीची आणि पगाराची उत्सुकतेने वाट पाहत असेल, तर कोणी स्वतःचा नवीन स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल. त्याच वेळी काही विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे ध्येय ठेवून असतील.

प्रत्येकाचे स्वप्न आणि ध्येय वेगळे असले तरी आज सर्वांच्या मनात भविष्याबद्दलचा उत्साह एकसारखाच दिसून येत आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, कालच ओरिएंटेशन झाल्यासारखे वाटते आणि पाहता पाहता आज दीक्षांत समारंभाचा दिवसही आला. आजपासून सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. सध्या जगभरातील व्यवस्था आणि तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत असून येत्या २० ते ३० वर्षांत जग कसे असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशा बदलत्या जगात केवळ तोच माणूस पुढे जाऊ शकेल, जो आयुष्यभर सतत नवीन गोष्टी शिकत राहील.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांनी विशेषतः विद्यार्थिनींच्या संख्येवर भाष्य केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदकांबद्दल आनंद व्यक्त करतानाच, जर या पुरस्कार विजेत्यांमध्ये मुलींची संख्या आणखी जास्त असती तर मला अधिक आनंद झाला असता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेवटी देशभक्ती आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून देताना त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीच्या त्यागाचे स्मरण केले. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामुळे आजच्या काळातील आव्हाने आणि आपल्या जबाबदाऱ्याही वेगळ्या आहेत. पुढील ३० ते ३५ वर्षांत आजचे तरुण जे काम करतील, त्यावरच ‘विकसित भारताच्या’ प्रवासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे आयुष्यात कोणताही निर्णय घेताना ‘यामुळे देशाचा काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल’ या विचाराला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *