Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे सरकारमधील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी काही आमदारांनी मंत्रीपदे, चांगली खाती, तर काहींनी महामंडळ अध्यक्षांची मागणी केली असून पक्षांतर्गत चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे.
या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईतील ‘मातोश्री’वर दुपारी १२ वाजता बैठक बोलावली. या बैठकीत काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ‘ऑपरेशन टायगर’च्या केवळ अफवा पसरवून सरकार मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या राज्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, बेरोजगारी, पेपरफुटी आणि मनोज जरांगे यांचे उपोषण यांसारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारने अशा राजकीय घडामोडींऐवजी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावत ठाकरे गटाचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला!
