Political news : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!
धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.शिंदे गटाची वाट धरणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली उंबरे आणि केसरबाई करवर यांचा समावेश आहे. या चार नगरसेवकांच्या जाण्यामुळे धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाचे आता केवळ तीन नगरसेवक शिल्लक राहिले असून, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कमालीची घटली आहे.
विशेष म्हणजे, हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश शिंदे गटात झाल्याने राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. या संपूर्ण घडामोडीला स्थानिक पातळीवर ‘ऑपरेशन टायगर’च्या यशाशी जोडले जात आहे.यापूर्वी कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आणि आता धाराशिवमधील चार नगरसेवक शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासाठी हा मोठा फटका मानला जात असून, शिंदे गटाची ताकद वाढल्याने आगामी काळात नगरपरिषदेच्या समीकरणांवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
