Pune: पुण्याजवळ कार अन् दोन रिक्षांची भीषण धडक; भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर जखमी!
पुणे १७ : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमाशंकर मार्गावर एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघाताची घटना घडली आहे. श्रावण महिना असल्याने अनेक भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. मंचरहून भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने, भीमाशंकरवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. कार आणि दोन रिक्षांमध्ये झालेली ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही रिक्षांमधील एकूण १२ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात जखमी झालेल्या भाविकांमध्ये लहान मुलांचाही सहभाग आहे, तर यातील ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतीचे काम सुरू केले आणि सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारमधील प्रवाशांनी मद्यसेवन केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिस या अपघाताचा सविस्तर तपास करत आहेत. पोलिस तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे!
