Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा पुणे दौरा आणि विद्यार्थ्यांशी संवाद!
ताज्या बातम्या पुणे

Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा पुणे दौरा आणि विद्यार्थ्यांशी संवाद!

Aug 21, 2026

पुणे २१ :नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच पेटला असून, याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘छात्रों की गूंज’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. राजस्थानमधील कोटा येथून सुरुवात झालेल्या या अभियानाचा पुढील टप्पा आता पुण्यात पार पडणार आहे. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पोलिसांकडून यासाठी सशर्त परवानगी मिळालेली आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्त्री शिक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे शहरात राहुल गांधी हे सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थिनींशी थेट चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात आले असून, त्या पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राहुल गांधींना थेट प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला पुण्यातून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, “काँग्रेस केवळ स्वतःच्या नेत्यांच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांचीच ‘गूंज’ ऐकवणार आहे,” असा टोला लगावला. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लागलीच आणि आक्रमकपणे प्रत्युत्तर दिल्याने पुण्यातील या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *