Sanjay Raut: धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी का केली? संजय राऊत यांनी स्पष्ट केला कोर्टातील घडामोडींचा घटनाक्रम!
Shivsena २० : धनुष्यबाण चिन्ह आणि न्यायालयातील घडामोडीसर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील अशी अपेक्षा असताना, या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्यानेच चिन्ह गोठवण्याचा पर्याय आमच्या वकिलांनी मांडला, असे राऊत म्हणाले. त्यांनी वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाचे कौतुक केले. काल झालेल्या सुनावणीत त्यांनी चांगले तांत्रिक मुद्दे मांडले असून त्यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचेच आहे. कोर्टाने चिन्हाबाबत पर्याय विचारल्यावर त्यांनी ते गोठवावं असं सुचवलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने यावर अधिक भाष्य करणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
विनोद तावडे यांचे कौतुक
संजय राऊत यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचे कौतुक केले. एका मराठी माणसावर जबाबदारी टाकली ही चांगली गोष्ट आहे. विनोद तावडे हे जुन्या फळीतील नेते असून भाजप-शिवसेना युतीच्या बाजूचे आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आस्था आहे. मंत्री असताना त्यांचे तिकीट कापले गेले आणि त्यांना अज्ञातवासात जावे लागले, पण कर्तृत्व लपत नाही; अशा शब्दांत सांगत त्यांनी तावडे यांना शुभेच्छा दिल्या.
वहिनी साहेबांना वेदना होत नाही का?
दरम्यान, चाकणसह राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचारावरून राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशा घटना घडत असल्याने लोकांमध्ये चिड आहे. लोकं रस्त्यावर आहेत. काय करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री? तुम्हाला महिला आरक्षण बिल मंजूर करायचं आहे. ते आधीच मंजूर झालेलं आहे. आता डुप्लिकेट विधेयक मंजूर करत आहे. ज्या कोवळ्या मुलींवर तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहेत. तुम्हाला, सरकारला, सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाही का? असा सवाल त्यांनी केला.ते तर फेल्युअर मंत्रीतुम्ही सर्व विषयांवर पोपटपंची करता. मी महाराष्ट्रातच राहीन, दिल्लीत जाणार नाही, यावर मत व्यक्त करता. शिवसेनेवर मत व्यक्त करता. सुप्रीम कोर्टात काय निकाल लागणार हे बेशक ठोकता. या राज्यात कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. राज्यात मुलींचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्यावर काही तरी बोलावं वाटतं का?पोलीस यंत्रणा बलात्काऱ्यांना वाचवत आहे. पोलीस संरक्षणात बेकायदेशीरपणे राज्य सुरु आहे. फडणवीस याबाबत फेल्युअर मंत्री आहेत. अमेरिकेचा हायकमिशनर मुंबईत आला. महाराष्ट्र आणि मुंबई यामुळे फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. कुणी सांगितलं? हेच ते हायकमिशनर ते जम्मू काश्मीरमध्ये बोलले. त्यांना मुंबईवरील अत्याचार दिसले नाही? सर्पदंशाने मुली मेल्या ते दिसलं नाही? हे व्यापारी लोक आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
पोलीस आयुक्तांना थेट आव्हान
यावेळी त्यांनी नवी मुंबईतील बलात्कार प्रकरणावरून थेट पोलिसांनाच आव्हान दिलं. साहिल देविदास चौगुले याने एका मुलीवर अत्याचार केला. आणि पळून गेला. त्याविरोधात अवधेश शुक्ला या आमच्या कार्यकर्त्याने आवाज उठवला. त्यानंतर आरोपी पकडला गेला. आता जामिनावर आहे. अवधेश शुक्लाने प्रकरण लावून धरलं. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. न्याय मागण्यासाठी मुलगी महिला आयोगाकडे जाऊन थकली.रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत हे नोटीस बजावून अवधेश यांना बोलावतात आणि चार चार तास बसवून ठेवतात. बाळकृष्ण सावंत गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. धमकी देत आहे. खोट्या प्रकरणात आत टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, अवधेशवर खोटी केस टाकाच. मी बघतो. तुरुंगात टाकण्याची धमकी पोलीस देत असेल तर राज्यात मुलींवर अत्याचार होतीलच. पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच नाही. पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, हे धमकीचं प्रकरण वेळीच मार्गी लावा. नाही तर मी मार्गी लावेन. साहिल देविदास चौगुले हा सत्ताधारी गटाचा आहे म्हणून त्याला सोडता? एकनाथ शिंदेंना सवाल आहे अशा प्रकरणांना तुम्ही अभय देत आहात? अशी प्रकरणं या महाराष्ट्रात घडत आहे. त्यामुळे राज्यभरात मुलींवर अत्याचार सुरू आहेत. कोणी आवाज उठवला तर वरून दबाव येतो. कधी भाजप, मिंधे तर कधी अजितदादा गटाचा दबाव येतो, असा दावाही त्यांनी केला!
