Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!
ताज्या बातम्या राजकारण

Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!

Aug 14, 2026

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण राजकीय वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ती प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच निवडणूक आयोगासह विविध संस्थांचा झालेला कथित गैरवापर हा लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं.शिवसेनेच्या पक्षनाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या हयातीत पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती, त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं त्यांनी सांगितलं. वेगळं मत असणाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणे स्वतंत्र पक्ष उभा करायला हवा होता, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. शरद पवार हे पक्षाचे फाउंडर मेंबर असून पक्षाच्या घटनेत नेतृत्वाबाबत स्पष्ट तरतुदी असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ आमदार-खासदारांचं संख्याबळ अधिक आहे म्हणून पक्षावर मालकी हक्क सिद्ध होत नाही, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.या दोन्ही प्रकरणांशी संबंधित आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याचंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थांवर टीका करण्याची आपली भूमिका नसली तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत आपल्याला जड अंतःकरणाने प्रश्न उपस्थित करावे लागत असल्याचं त्यांनी म्हटलं.दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटी, पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव आणि चिन्हाबाबत न्यायालयीन प्रक्रियेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *