Thane: जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी; सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
ठाणे (15) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून डॉ. प्रदीप उप्पल (ईएनटी सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (13 ऑगस्ट ) उत्साहात पार पडला. जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांची तपासणी करुन कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू न देता त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संख्ये, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, राजन किणे, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, विकास रेपाळे, नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राणी शिंदे, वैद्यकीय सहायता निधीचे मंगेश चिवटे, ज्युपीटर रुगणालयाचे डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. उमा उप्पल, दिव्यांग कला केंद्राचे किरण नाक्ती, कर्णबधीर शस्त्रक्रिया झालेली मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॉक्लिअर इम्प्लांटमुळे नवजीवन मिळालेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हेच या कार्याचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
“ऑपरेशनसाठी कसलीही निधीची पैशांची कमतरता भासू देणार नाही. ज्या मुलांना उपचारांची गरज आहे त्यांची यादी तयार करा. निधी, सुविधा किंवा इतर कोणतीही आवश्यकता असेल तर शासन आणि ठाणे महानगरपालिका तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच कर्णबधिर मुलांवर लहान वयात उपचार झाल्यास शंभर टक्के परिणामकारक लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा मुलांचा वेळेत शोध घेऊन उपचाराची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रदीप उप्पल यांनी शस्त्रक्रिया केलेल्या मुलांची एक नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेच्या माध्यमातून कर्णबधीर मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा त्यांच्या पालकांना ही बाब लक्षात येते तेव्हा त्या कुटुंबांची होणारी घालमेल, शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात मिळवताना होणारी दमछाक व शासनाच्या माध्यमातून प्राप्त निधीतून यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सामान्य मुलाप्रमाणे जेव्हा मूल ऐकू बोलू लागते तेव्हा त्या कुटुंबाला होणारा आनंद हा गगनात मावेनासा होत असल्याचे पाहताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भावूक झाले. यावेळी त्यांनी या मुलांसोबत संवाद साधला. तसेच नाटिकेचे लेखन दिग्दर्शन करणाऱ्या दिव्यांग कलाकेंद्राचे किरण नाक्ती यांचेही कौतुक केले.
कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणाऱ्या ठाणे महापालिकेचे व ही यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रदीप उप्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. वैद्यकीय उपचारांसोबतच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीही मोठी समाजसेवा आहे असे नमूद करुन त्यांनी दिव्यांग कला केंद्राचे किरण नाक्ती यांचेही कौतुक केले. भविष्यात अधिकाधिक मुलांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दिव्यांग कलाकेंद्राच्या ‘शोध कलाकारांचा.. दिव्यांगातील कलागुणांचा’ या उपक्रमाचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.भुवड कुटुंबियांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मदतीचा धनादेश6 जुलै रोजी झाड कोसळून या घटनेत दुर्देवी मृत्यू झालेल्या कै. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
