Thane: ठाणे शहराच्या ३०२.३८ कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन!
ठाणे न्यूज

Thane: ठाणे शहराच्या ३०२.३८ कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन!

Aug 17, 2026

ठाणे १७ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण व्यवस्था बळकट करण्यासाठी ३०२.३८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र शासनाच्या शिखर समितीसह राज्य शासनाने मंजुरी दिली. शहरातील मलवाहिन्यांमधील त्रुटी दूर करण्यापासून नव्या विकसित भागांत मलवाहिन्यांचे जाळे उभारण्यापर्यंत विविध कामे या प्रकल्पातून केली जातील.पहिल्या टप्प्यात कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, उथळसर, लोकमान्य-सावरकर नगर व वर्तक नगरच्या काही भागांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात कळवा, विटावा, खारेगाव, माजिवडा, मानपाडा व वर्तक नगरच्या काही भागांचा समावेश आहे, तर तिसऱ्या टप्प्यात मुंब्रा आणि कौसा परिसराचा समावेश आहे.

केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानाची अंमलबजावणी १४ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असून, या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सरोवरांचे पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकासाशी संबंधित विविध प्रकल्प राबविले जात आहेत. राज्याच्या एकूण २९ हजार ७४२ कोटी रुपयांच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून, याच अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मल:निसारण व्यवस्थेसाठी ३०२.३८ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत नागरी विस्तारही वेगाने होत आहे.

त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मल:निसारणाची व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. शहरातील सध्याच्या मलवाहिन्यांमध्ये ज्या ठिकाणी अंतर आहेत ते दूर करण्यात येणार असून, विविध विकासकामांमुळे बाधित झालेल्या मलवाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत. तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या भागांत अद्याप मलवाहिन्यांची सुविधा उपलब्ध नाही, अशा भागांमध्ये नव्याने मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत ओपन कट पद्धतीने सुमारे २६ हजार ९७५ मीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे १९ हजार ५७० मीटर लांबीच्या मलवाहिन्या उभारण्यात येणार आहेत.याशिवाय चार मलउच्चलन केंद्रे, सांडपाणी संकलन व्यवस्था, मुख्य मलवाहिनी व ऑक्झिलरी उपसा पंप उभारण्याची कामेही प्रकल्पात प्रस्तावित आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील सांडपाणी संकलन आणि वाहतुकीची यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या ३०२.३८ कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील विद्यमान मलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी दूर होण्यासोबतच नव्याने विकसित होत असलेल्या भागांमध्येही मलवाहिन्यांचे जाळे निर्माण होणार आहे.

सांडपाणी संकलन आणि वाहतुकीची व्यवस्था सक्षम झाल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेलाही त्याचा फायदा होणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारली जाणारी ही सुविधा ठाणे शहराच्या पायाभूत विकासातील महत्त्वाची भर ठरणार आहे.या प्रकल्पाचे काम १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण व्यवस्थेला अधिक व्यापक आणि सक्षम स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या नागरी विकासाला आणखी गती मिळण्यासोबतच नागरिकांना अधिक सक्षम आणि शाश्वत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.चौकट ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विद्यमान भूमिगत गटार योजनांचाही या प्रकल्पामध्ये विचार करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, उथळसर, लोकमान्य-सावरकर नगर आणि वर्तकनगरच्या काही भागांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात कळवा, विटावा, खारेगाव, माजिवडा, मानपाडा आणि वर्तकनगरच्या काही भागांचा समावेश आहे, तर तिसऱ्या टप्प्यात मुंब्रा आणि कौसा परिसराचा समावेश आहे. या योजना २०३६ मधील प्रक्षेपित लोकसंख्या लक्षात घेऊन संकल्पित करण्यात आल्या आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *