Thane: प्रभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या..आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
ठाणे न्यूज

Thane: प्रभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या..आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

Aug 14, 2026

ठाणे १४ : बनावट कागदपत्रे सादर करून करपावत्या बनवण्याचा उद्योग सुरु असून यात प्रभाग कार्यालयांमधील संबंधित अधिकारी लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दाखल झाल्या. याबाबत प्रशासनाला इशारा देतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासूनच करपावत्या तयार कराव्यात, अशा सूचना आमदार संजय केळकर यांनी केल्या.सध्या ठाण्यात गृहनिर्माण योजना मोठ्या प्रमाणात सुरू असून रहिवाशांच्या यादीत घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून प्रभाग कार्यालयांमध्ये करपावत्या बनवून घेतल्या जात आहेत. याकामी संबंधीत अधिकारी एक एक लाख रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात प्राप्त झाल्या. विविध सोयी सुविधा मिळवण्यासाठी देखील बनावट कागदपत्रांद्वारे कर पावत्या बनवल्या जात आहेत.

या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना इशारा देतानाच कागदपत्रे तपासून कर पावत्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.महात्मा फुले मार्केटच्या मागे हजारो चौरस फूट जागेवर रातोरात अनधिकृत बांधकाम झाले असून संबंधित सहायक आयुक्तांना तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे हे भूमाफिया मार्केटमधील लोकांना दमदाटी देखील करत असल्याच्या तक्रारी आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवून संबंधित सहायक आयुक्तांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली आहे. वन जमिनींवरही अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई करण्यात चालढकल होत आहे. वन अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली नाही तर वनमंत्र्यांना कळवून अतिक्रमण निष्कासित करण्यास आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास भाग पाडू, असे श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नगरसेवक सीताराम राणे, सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका अनिता यादव, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.

हजुरी एसआरएबाबत भाजप रस्त्यावर उतरणार

हजुरी येथील सुरू असलेल्या एसआरए योजनेत विकासकाने रहिवाशांच्या इमारती रखडवल्या आणि भाडेही थकवले आहे, मात्र त्याचवेळी विक्रीच्या इमारतीचे बांधकाम परवानगी नसताना सुरू आहे. एसआरए अधिकाऱ्यांनी तातडीने विकासकावर कारवाई करून बांधकाम थांबवावे, अन्यथा भाजपला रहिवाशांच्या हक्काच्या घरांसाठी रस्त्यावर उतरून बांधकाम थांबवावे लागेल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *