Thane: तरुणांची ऊर्जा, देशप्रेम आणि ‘Gen Z’ चा हुंकार. गडकरी रंगायतन येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ‘I am Responsible Gen Z’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद!
ठाणे न्यूज

Thane: तरुणांची ऊर्जा, देशप्रेम आणि ‘Gen Z’ चा हुंकार. गडकरी रंगायतन येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ‘I am Responsible Gen Z’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

Aug 13, 2026

ठाणे १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने “I am Responsible Gen Z – My Country.. My Commitment…” हा विशेष कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अतिशय दिमाखात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. नवपिढीमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील २५ हून अधिक महाविद्यालयांतील तरुण-तरुणींनी आंतरमहाविद्यालयीन रिल्स स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला थेट आणि प्रेरणादायी संवाद. आजच्या ‘Gen Z’ पिढीतील बुद्धिमत्ता आणि कल्पकता अफाट असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना आपल्या कौशल्याचा देशासाठी वापर करण्याचे आवाहन केले.

वयाच्या विसाव्या-पंचविसाव्या वर्षी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ‘Skyroot Aerospace’ चे संचालक, ‘Cool the Globe’ ॲपच्या निर्मात्या आणि ‘Robotic Artificial Limb’ क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण संशोधकांची उदाहरणे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडली.कार्यक्रमप्रसंगी प्रास्ताविक मांडताना कार्यक्रमाचे आयोजक आणि अध्यक्ष श्री. सचिन मोरे यांनी या संकल्पनेमागील भूमिका विशद केली. “तरुण वयात असणारी ऊर्जा योग्य दिशेने वापरली, तर समाज आणि देशाचा उत्कर्ष वेगाने होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुण वयातच आपल्या अफाट ऊर्जेचा वापर करून इतिहास घडवला. हाच आदर्श आजच्या ‘Gen Z’ पिढीने आपल्या आयुष्यात अवलंबून यशाची शिखरे गाठावीत,” असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन रील स्पर्धेत १३० पेक्षा जास्त कल्पक रील्स सादर करण्यात आल्या होत्या. त्यातील सर्वोत्तम पहिल्या पाच रील्सना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, आर. जे. ठाकूर महाविद्यालय, एन. के. टी. महाविद्यालय आणि श्रीमती जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयातील १४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात अत्यंत शांतचित्ताने हजेरी लावली.या सोहळ्याला आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, नगरसेवक मनोहर डुंबरे, मा. श्री. नारायण पवार, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. कमलेश प्रधान, आर. जे. ठाकूर महाविद्यालयाचे सचिव श्री. मंगेश ठाकूर, मा. श्री. अरविंद जोशी, श्री. विलास साठे, श्री. ऋषिकेश दंडे आणि महाविद्यालयाच्या कार्यकारी विश्वस्त श्रद्धा मोरे व प्राचार्य डॉ. अनिल सिंग यांसारखे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *