Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!
ठाणे न्यूज

Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!

Aug 6, 2026

ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आज झालेल्या बैठकीस कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता विनय सुर्वे, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगरअभियंता विद्युत शुभांगी केसवाणी, सहायक आयुक्त महेश जामनोर, राजेश सोनावणे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, प्र. मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते.

रायलादेवी परिसरातील विविध कामांबाबत स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेवून दिलेल्या निवेदनानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. रायलादेवी परिसरातील संरक्षित भिंत, उतार, परिसरातील खुल्या जागांची सुरक्षितता, पार्किंग व्यवस्था आदी कामांचा आढावा घेण्यात आला. रायलादेवी तलाव परिसराबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या, त्या अनुषंगाने या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून त्यानंतर अंतर्गत कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. तसेच या परिसरात गर्दुल्ले तसेच मद्यपीचा असलेला वावर या दृष्टीने परिसरात पोलीसांची गस्त वाढविणे तसेच या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना ही देण्यात आल्या.

दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तलाव परिसराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि करण्यात येणारी कामे याबाबत एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तलाव परिसरात सुरक्षा शेड, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा, विद्युत सुविधांतील त्रुटी दूर करणे तसेच स्वच्छता आणि देखभाल नियमितपणे करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

याशिवाय तलाव परिसरात सीसीटीव्ही देखरेख अधिक सक्षम करण्यासाठी लावण्यात आलेले लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अतिक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, डेब्रिज हटविणे, एमएसईडीसीएलशी समन्वय साधून वीजपुरवठ्याशी संबंधित कामे पूर्ण करणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश आयुक्त्‍ सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिले.


बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *