Thane: हर घर तिरंगा अभियान’‘आपण आमचे खरे हिरो आहात’.. विद्यार्थ्यांचे जवान आणि पोलीसांना भावनिक पत्र;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
ठाणे न्यूज

Thane: हर घर तिरंगा अभियान’‘आपण आमचे खरे हिरो आहात’.. विद्यार्थ्यांचे जवान आणि पोलीसांना भावनिक पत्र;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

Aug 13, 2026

ठाणे १३: देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत ‘भारतीय जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान’ राबविण्यात आले. मंगळवार (11 ऑगस्ट 2026) रोजी शहरातील विविध मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर जवान व पोलिसांना पत्रे लिहून त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजविणे, तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

विविध मनपा शाळांमध्ये एकाच वेळी देशभक्तीचा जागर

मनपा शाळा क्र. 1,  शाळा क्र. 60, बाळकुम, शाळा क्र. 11 राबोडी, शाळा क्र. 64, शाळा क्र. 55 आझाद नगर, शाळा क्र. 62 कासारवडवली, शाळा क्र. 56 ओवळा, शाळा क्र. 58  भाईंदरपाडा, शाळा क्र. 75, शाळा क्र. 98,गौतम हिंदी स्कूल, आदर्श इंग्ल‍िश स्कूल या विविध शाळांमध्ये जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखनाचे आयोजन करण्यात आले. सर्व शाळांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परबवाडी येथील शाळा क्र. 18 मध्ये हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, वागळे पोलीस स्टेशनच्या आरटीओ पोलीस अधिकारी सौ. मुल्ला, तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच गटाधिकारी संगीता बामणे, URC-२ चे प्रमुख रविंद्र पाटील, गटप्रमुख नीलिमा पाटील आणि CRC समन्वयक आशा पाटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.

आपण आमचे खरे हिरो आहात’… विद्यार्थ्यांच्या पत्रातून कृतज्ञता

पत्रलेखन उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डचा वापर करून जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मनापासून पत्रे लिहिली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना जवानांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे धैर्य, त्याग आणि देशसेवा याबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘आपल्या देशसेवेला मनःपूर्वक सलाम’, ‘आपण आमचे खरे हिरो आहात’, अशा भावनिक शब्दांत विद्यार्थ्यांनी जवान व पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत असल्याची जाणीवही विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली.

विविध शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पत्रलेखनासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार आणि भावनेनुसार पत्रे लिहिली. काही विद्यार्थ्यांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी देशाच्या सीमेचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

शालेय जीवनातच देशभक्तीचे संस्कार रुजविणारा आणि विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या रक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रवृत्त करणारा हा उपक्रम प्रेरणादायी आणि भावनिक ठरला.


बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *