Thane: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट…राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी रश्मी ठाकरेंबाबत राऊतांची शिवीगाळ… एकनाथ शिंदेंविरोधात एकतरी पत्र दाखवा, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या!
नवी दिल्ली १३: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा राजीनामा घ्यावा आणि स्वत: मुख्यमंत्री बनावं यासाठी संजय राऊत यांनी पवईतील हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे काम करत नाहीत, त्यांना विरोध करा, मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव पुढे करा, असा आग्रह राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता. असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचे एकतर पत्र दाखवा नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिले. माझ्या विरुद्ध पहिल्या दिवसापासून तुमच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देतो म्हणून ५०-५० माणसे सोशल मीडियामध्ये विरोधात कॉमेंट्स करण्यासाठी सकाळ दुपार रात्र ठेवलेली आहेत. इतकी वेळ तुमच्या वर आली आहे मी यात स्वतःचा मोठेपणा समजतो.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभेची उमेदवारीबाबत राऊत यांचे नाव जाहीर करण्यास उशीर झाल्याने संतापलेल्या राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यासाठी राऊत यांनी षडयंत्र रचले होते. पवईतील हॉटेलात आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विरोध करण्याचे आदेश आमदारांना दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांचे मी पाहुन घेईन. उद्धव ठाकरे काम करत नाहीत ते अपयशी ठरलेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवा, अशी भूमिका राऊत यांनी याबैठकीत मांडल्याचा असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिले नाही. तसेच खासदारकीची उमेदवारी देण्यात उशीर झाल्याने राऊत हे उद्धव ठाकरेंवर चिडले होते, हे शिवसेनेत सर्वश्रुत आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हा प्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंनी फोन केला तेव्हा त्यांनाही मी वर्षा बंगल्यावर येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे, असे उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगणारा मी एकमेव होतो, असे खासदार म्हस्के म्हणाले. ठाण्याचे नेतृत्व कर, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, मात्र आपण शिंदे साहेबांसोबतच जाणार, असे वर्षा बंगल्यावर ठणकावून सांगणारा मीच एकमेव होतो, असे खासदार म्हस्के म्हणाले. सकाळचा भोंगा अशी उपमा दिल्याने राऊतांना आपल्यावर राग आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.
विधान परिषदेची मलाच उमेदवारी मिळणार होती, पण आमदार झालो तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्ष सोडून जाईन, असं उद्धव ठाकरेंना वाटले आणि त्यांनी आमशा पाडवींना उमेदवारी दिली, असे राऊत तुम्हीच अयोध्येत मला एकनाथ शिंदेंसमक्ष सांगितले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ फोन करुन तुम्ही काय काय बोलत होतात, हे तुम्हीच जाहीर करा. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारीचे एकतरी पत्र दाखवा अन्यथा तुमच्या खासदाराकीचा राजीनामा द्या, असे प्रतिआव्हान खासदार म्हस्के यांनी दिले.राऊत यांचे ठाकरेंबाबत बेगडी प्रेम आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचे खूळ राऊत यांनीच घातले आणि महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री दिला. एकसंध पक्षाचे वाटोळे करण्याचे काम राऊत यांनी केले. राऊतांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता आणि काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. शिवसैनिकांचे शाप तुम्हाला भोगावे लागतील, असे खासदार म्हस्के म्हणाले.
