Thane: ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता; तब्बल ११ वर्षांनंतर टीएमटी बस प्रवासाच्या भाडेवाढीची तयारी!
ठाणे १० : ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत असून, ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बस प्रवासाच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. टीएमटीच्या तिकीट दरवाढीचा हा प्रस्ताव आगामी महापालिकेच्या सभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तब्बल ११ वर्षांनंतर भाडेवाढीची तयारी सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वाढता इंधन आणि देखभाल खर्च, बससेवेवरील वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच टीएमटीसमोर असलेल्या आर्थिक अडचणींचा हवाला देत या भाडेवाढीचे समर्थन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अंतराच्या टप्प्यानुसार तिकिटात साधारण दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती, तर एसी बसमध्ये १० रुपयांची वाढ झाली होती. त्यानुसार आताही पहिल्या टप्प्यासाठी दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
हा भाडेवाढीचा प्रस्ताव महासभेत आल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा थेट आणि मोठा परिणाम दररोज टीएमटीने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मासिक खिशावर होणार आहे. एकीकडे भाडेवाढ होणार असली, तरी शहरातील अनेक मार्गांवर अपुऱ्या बससंख्येमुळे प्रवाशांना आजही प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. काही मार्गांवर बसच्या फेऱ्या कमी असणे किंवा वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्याच्या तक्रार प्रवाशांकडून सतत केल्या जातात. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनंतर होणाऱ्या या भाडेवाढीच्या बदल्यात प्रवासी प्रवासात खरोखरच अपेक्षित सुधारणा होणार का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे!
