Thane: विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी…ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती; 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण!
ठाणे न्यूज

Thane: विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी…ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती; 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

Aug 15, 2026

ठाणे, ता, १५: 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला.

यावेळी बोलताना, ड्रोन, क्षेपणास्त्रे, सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, आधुनिक युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणालीमुळे भारताची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शांतता, सुरक्षा आणि विकास हीच नवी त्रिसूत्री
देशातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली शांतता, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीमुळे देशाच्या दुर्गम भागातही विकासाची नवी पहाट उगवली असल्याचे सांगितले.

“विकसित भारत २०४७ हे घोषवाक्य नाही, तर १४० कोटी भारतीयांचा संकल्प आहे,” असे सांगताना त्यांनी प्रत्येक शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सामान्य नागरिकाच्या सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राचा पराक्रम, संतांची शिकवण, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याचे ज्ञान, विदर्भाची सुपीक शेती आणि कोकणचे सामर्थ्य यामुळे राज्य देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करत आहे. महाराष्ट्राचे योगदान देशाच्या वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सर्वाधिक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे सांगत शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सिंचन, सुधारित अवजारे, कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन गृहनिर्माण धोरणाद्वारे गरीब व मध्यमवर्गीयांना परवडणारी पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
पुनर्विकासात अधिकृत अथवा अनधिकृत रहिवाशांवर अन्याय होणार नाही. प्रत्येकाला न्याय, हक्क आणि सन्मानाने घर मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ४४ कोटी रुपयांचे विशेष निधी अभियान सुरू करण्यात आले आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण, नागरी सुविधा आणि शाश्वत शहर विकासावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो, ठाणे–बोरिवली बोगदा, धोडबंदर मार्ग, वाहतूक सुधारणा, पुनर्विकास, ओपन स्पेस आणि नागरिकांना विश्वासात घेऊन राबविले जाणारे प्रकल्प ठाण्याचे भवितव्य बदलतील. कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग आता अधिक वाढला असून नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडविणारे आरोग्य, कृषी, शिक्षण, सुरक्षा आणि डिजिटल प्रशासनाचे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यात राज्यातील सर्वात मोठे ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जात असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून ३५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला, तर २६८ जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कृषी विलगीकरण योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून ॲग्री-स्टॅक प्रणालीवर ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषद योजनांमधून २,१०० लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजारे, सिंचन साहित्य, तारेचे कुंपण, प्लास्टिक लाइनिंग आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ बनू शकतात, हा विश्वास या उपक्रमातून अधिक दृढ झाला असल्याचे शिंदे म्हणाले.

ठाणे शहरात ६,०५९ एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ऍप, तर पोलीस व जनतेतील दरी कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ सुरू करण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून डिजिटल युगात नागरिकांचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस तसेच सर्वसामान्य ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *