उल्हासनगर १३: उल्हासनगर कॅम्प-४ मधील एका भाड्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर अचानक धाड टाकली.या कारवाईदरम्यान देहविक्रीच्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला रंगेहाथ पकडण्यात आले असून पोलिसांनी या तिघांनाही तत्काळ अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जास्त पैशांचे आमिष दाखवून या महिलांना देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही पीडित महिलांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या देहविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. उल्हासनगरमध्ये घडलेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे!
