ZP Election : रखडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुकांना गती, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता!
ताज्या बातम्या महाराष्ट्र

ZP Election : रखडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुकांना गती, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता!

Jul 31, 2026

ZP Election : २२ जिल्हा परिषदांच्या रखडलेल्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी आरक्षणावरील ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जानेवारी महिन्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, उर्वरित २२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या वादामुळे निवडणुका घेता आल्या नव्हत्या. आता ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून नव्याने आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याचबरोबर मुदत संपलेल्या १०५ नगरपंचायती आणि सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.नव्या आरक्षण रचनेमुळे काही ठिकाणी आरक्षित जागांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे विशेषतः ओबीसी आरक्षणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदाहरणार्थ, नागपूर जिल्हा परिषदेत आरक्षित जागांची संख्या ३३ वरून २७ पर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका होत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थेट लढती पाहायला मिळण्याची शक्यता असून, ठाणे व पालघरसारख्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि विरोधकांमध्ये चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता आहे.रखडलेल्या २२ जिल्हा परिषदांमध्ये: पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *