गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
ताज्या बातम्या न्यूज मुंबई

गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!

Aug 6, 2026

मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.पूर्वेश सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेत गोविंदांना अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच उपचार खर्चासाठी व्यापक विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयानुसार अपघाती मृत्यू किंवा दोन्ही अवयव अथवा दोन्ही डोळे गमावल्यास १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी १० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीतील तरतुदीनुसार भरपाई दिली जाणार आहे. तसेच अपघातामुळे झालेल्या रुग्णालयीन उपचारांसाठी प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल १ लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध होणार आहे.यंदा विमा संरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गोविंदांची संख्या १.६० लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, प्रत्येक गोविंदासाठी अत्यल्प प्रीमियममध्ये विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी राज्य क्रीडा विकास निधीतून खर्च केला जाणार आहे.युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या निर्णयाचे स्वागत करत, “गोविंदा हा आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे.

उत्सवाचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदाची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो गोविंद आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा असून, यापुढेही गोविंदांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे सांगितले. तसेच या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.या निर्णयामुळे राज्यभरातील दहीहंडी मंडळे, गोविंदा पथके आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित आणि विश्वासाने साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *