राजकारणाची सूत्रे आता तरुण पिढीच्या हाती…प्रस्थापित पक्षांचे Gen-Z वर लक्ष!
भारतातील ‘Gen-Z’ तरुण पिढी ने उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनाने केंद्र सरकारलाही हादरवून सोडल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे. या तरुणांची वाढती ताकद आणि क्रेझ लक्षात घेऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले लक्ष पूर्णपणे या तरुण पिढीकडे वळवले असून पुण्यात पार पडलेल्या बैठकीत ‘Gen-Z’ ला केंद्रस्थानी ठेवूनच आगामी रणनीती आखली आहे. दिल्लीतील पेपरफुटीविरोधातील आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरून तरुणांचे समर्थन केले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना Gen-Z वर विशेष फोकस करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.केवळ मनसेच नाही तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षांनी या तरुण पिढीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपविरोधात निर्माण झालेला या तरुणांचा रोष शांत करण्यासाठी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर व्यासपीठावरून तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तरुणांचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘इन्स्टाग्राम’चा वापर करत व्हिडिओद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला.थोडक्यात सांगायचे तर, आगामी काळातील सत्ताकारणाची सूत्रे ही Gen-Z च्या अवतीभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अभिजित दिपके यांच्या CJP ने सध्या नवीन पक्ष स्थापन करणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे, प्रस्थापित पक्षांचा डोळा आता या तरुण जनाधारावर आहे. आधी मराठीचा मुद्दा आणि नंतर हिंदुत्वाचा विचार यानंतर आता राज ठाकरेंनी ‘नवनिर्माणा’साठी Gen-Z ची साथ घेत आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. आता या तरुण पिढीच्या बळावर मनसेचे इंजिन सुसाट धावणार की त्याला ब्रेक लागणार, हे येणारा काळच ठरवेल!
