लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको…हजारो नागरिकांचा एल्गार;पुनर्वसनाशिवाय प्रकल्प रेटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
ठाणे, दि. ७ सप्टेंबर : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.या वेळी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांनी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य नाही, रिंग मेट्रो प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, अशा पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
काही मोजक्या हितसंबंधांसाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची घाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि बाधित होणाऱ्या नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाही देखील मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली. यावेळी बैठकीला जितेंद्रकुमार इंदिसे (आरपीआय एकतावादी), जयेंद्र दरेकर (उपशहरप्रमुख, शिवसेना), रामचंद्र गुरव (विभागप्रमुख), राजीव शिरोडकर (विभागप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), भालचंद्र देसाई (विभागप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), प्रदीप चव्हाण (भाजप), सागर भोसले (मनसे), बालेश हत्तीआंबीरे (राष्ट्रवादी काँग्रेस—शरदचंद्र पवार पक्ष), मल्हारी सावरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), शीतल संतोष ढमाले (नगरसेविका) आणि राकेश शिंदे (नगरसेवक) उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “लोकमान्यनगरातील रहिवाशांच्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा जाऊ देणार नाही.
मी स्वतः आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक तोडगा काढतो.” यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी, भीती आणि भविष्यातील संभाव्य संकटांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. मेट्रो प्रकल्प ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असला, तरी त्यासाठी लोकमान्यनगराला किंमत मोजावी लागणार असेल, तर प्रकल्पाच्या नियोजनावरच पुनर्विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.लोकमान्यनगरातील हजारो घरे बाधित झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.
त्यातच काही बिल्डरांच्या कथित हितासाठी लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा डाव आहे का?, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला.“लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी संघटनेत नव्याने दाखल झालेल्या काही स्वार्थी प्रवृत्तींवरही निशाणा साधला.
ते म्हणाले, “गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला लोकमान्यनगरचा भाग एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली अभेद्य राहिला आहे. मात्र, काही स्वार्थी आणि आपमतलबी लोकांच्या मनमानीला लोकमान्यनगरवासीय भीक घालणार नाहीत. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवून कोणताही प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाला, तर जनतेचा रोष रस्त्यावर दिसेल.”दरम्यान, “काही विघ्नसंतोषी लोक आपल्या स्वार्थासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरून व्हिडिओ व्हायरल करीत रिंग मेट्रोला समर्थन मिळविण्याचा तकलादू प्रयत्न करीत आहेत.
अशा लोकांच्या भूलथापांना लोकमान्यनगरची जनता बळी पडणार नाही. किंबहुना, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे यांनी दिला.ठाण्याचा विकास हवा; पण लोकमान्यनगरच्या विनाशाच्या किमतीवर नाही! नागरिकांचे हित, बाधितांचे योग्य व १०० टक्के पुनर्वसन आणि पर्यायी मार्गांचा विचार केल्याशिवाय रिंग मेट्रो प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे!
