Manoj jarange patil: अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही”, मनोज जरांगेंनी मराठ्यांना केलं सावध; १२ तारखेला अंतरवालीत येण्याचं आवाहन!
Manoj Jarange Warning Maratha Reservation Ajit Pawar : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा दहावा दिवस आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर तोफ डागली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी लावली जाते, त्यांना राजकीय-सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलं जातं, असं मनोज जरांगे म्हणाले. अंतरवाली सराटीत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीकास्र सोडलं.
१२ तारखेला अंतरवलीत या- जरांगे
मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत बोलावलं आहे. या दिवशी बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. “या सरकारचा माज उतरवायचा असून १२ तारखेला अंतरवलीत सर्वांना या”, असं आवाहन त्यांनी केलं. “देवेंद्र फडणवीस सरकार मोगलापेक्षाही वाईट दिवस आणू शकतो. व्यावसायिकांच्या मागे ईडी लावतो नाहीतर स्वतःच्या पक्षात घेतो. त्यांच्याविरोधात वाट्टेल तसे केस दाखल करतो”, असं मनोज जरांगे म्हणाले.
भाजपाकडून मग्रुरी आणि हिटलरशाही…
त्यांनी मराठी समाजातील व्यावसायिक आणि राजकारण्यांनाही सावध केलं. मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही गरीब आहोत. पण हे सरकार राजकीय लोकांच्या मागे ईडी लावून त्यांना उद्ध्वस्त केलं जातंय. त्यामुळे शहाणे व्हा. राजकीय मराठ्यांचे हे हाल आहेत. व्यावसायिक मराठ्यांचेही हे हाल आहेत. इतकी मग्रुरी आणि हिटलरशाही असेल तर तुमच्या जिंदगीवर थुंकावं वाटतंय. हे हाल या राज्यात चालवले आहेत. इतका मग्रुर शासक राज्याला परवडणार नाही. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचे हाल चालू आहेत. इतका मग्रुरी असलेला फडणवीस चांगला नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.
अजितदादांचं काय झालं कळलं नाही…
पुढे त्यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “अजित दादांचं काय झालं, हे कोणाला अजून कळलंच नाही. किती दिवस रिपोर्ट येणार, तपास लागणार असंच सांगितलं जातंय. सोन्यासारखा माणूस गेला. राजकारणापलीकडे जाऊन समजून घ्यावं लागेल.”“मराठ्यांच्या आरक्षणाचं काम तर करायचंच नाही. पण शरद पवारांनी मराठ्यांसाठी काय केलं? उद्धव ठाकरेंनी काय दिलं? काँग्रेसने काय दिलं? तुम्ही काय दिवे लावले? आम्ही जे केलं तर कोणीच केलं नाही असं सरकार म्हणत आहे. पण तुम्ही देऊन परत उघडं पाडलं, त्यांनी (महाविकास आघाडीने) निदान दिलं तर नाही. महाविकास आघाडीची बाजू घेत नाही, त्यांनीच वाटोळं लावलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसने काहीच दिलं नाही. पण तुम्ही (महायुती) वाटोळं केलं” असं मनोज जरांगे म्हणाले!
