स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ,गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण!
आरोग्य ठाणे

स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ,गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण!

Jul 29, 2026

ठाणे २९: गेली २० वर्षे ठाणे व परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम – बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या २० वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था आता संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी “दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र”हा अभिनव उपक्रम सुरू केला असून आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

स्वयम संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, विशेष शिक्षण, समुपदेशन, सहाय्यक उपकरणांचे वितरण, गृहस्थित उपचारांचे मार्गदर्शन तसेच पालकांसाठी प्रशिक्षण अशा विविध सेवा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या दोन दशकांत हजारो दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक ताण कमी करण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत.महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक दिव्यांग व्यक्तींना उपचार, प्रमाणपत्रे, सरकारी सुविधा आणि पुनर्वसन सेवा मिळविण्यासाठी वारंवार शहरात यावे लागते.

दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी हा प्रवास शारीरिकदृष्ट्या कठीण तर आर्थिकदृष्ट्याही परवडणारा नसतो. विशेषतः मोठ्या वयाच्या दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतुकीने उपचार केंद्रात ने-आण करणे अनेक पालकांसाठी अशक्य होते. याच समस्येवर उपाय म्हणून स्वयम संस्थेने “दिव्यांगांसाठी फिरते वैद्यकीय सुविधा केंद्र” ही संकल्पना विकसित केली आहे.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गावाजवळच आवश्यक वैद्यकीय, पुनर्वसन आणि मार्गदर्शनाच्या सेवा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा मनोसामाजिक आणि आर्थिक ताण कमी करणे, आणि फिरत्या सुविधा केंद्राद्वारे वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे. यात प्रामुख्याने..

• सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड मिळविण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणे

.• सहाय्यक उपकरणे व साहित्य वाटपासाठी लाभार्थ्यांचे मूल्यमापन करून वितरण शिबिरे आयोजित करणे

.• पालकांना गृहस्थित उपचार, व्यायाम, मुलांना योग्य प्रकारे हाताळण्याच्या पद्धती, सहाय्यक साधनांचा वापर आणि आवश्यक समुपदेशनाचे प्रशिक्षण देणे

.• दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करणे.

• अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांसाठी दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान आणि प्रारंभिक हस्तक्षेप यावरील प्रशिक्षण देणे

.• दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे.

• व्यवसाय मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि उपजीविकेसाठी प्रशिक्षण देणे.

• दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सवलती आणि सुविधांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे, असा उद्देश आहे.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दारापर्यंत आवश्यक सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असून, दिव्यांगांचे पुनर्वसन अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास स्वयम संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.आज या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्वयम बहुविकलांग संस्थेच्या संचालिका नीता देवळालकर, राजीव देवळालकर, श्रेया देवळालकर आणि शिवसेनेचे अमित लोटलीकर, बालाजी पाटील खतगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *