झेन झीने एका पक्षाची अन् एका माणसाची दहशत संपविली डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; पुढील निवडणुकीत 12 चे 50 नगरसेवक करणारच – मनोज प्रधान ठाणे!
न्यूज राजकारण

झेन झीने एका पक्षाची अन् एका माणसाची दहशत संपविली डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; पुढील निवडणुकीत 12 चे 50 नगरसेवक करणारच – मनोज प्रधान ठाणे!

Aug 1, 2026

जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले, असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरूण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली; या झेन झी ने आपणां सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गौरवोद्गार काढले. दरम्यान, पुढील महानगर पालिका निवडणुकीत 12 वरून 50 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची असेल, असा आशावाद मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जयभगवान हाॅल येथे शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यास डाॅ.जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते. डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपल्याला २०१४ पासून जी भीती होती, आईसची म्हणजेच इन्कम टॅक्स, सी.बी.आय. आणि इ.डी. या तीन संस्थांची मात्र, आपल्याकडे हरण्यासारखे काहीच नाही, याची जाणीव असलेल्या झेन झी पिढीने आपण घाबरायचे कशाला? असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरूवात केली. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान अनेक तत्ववेत्त्यांनी सांगितले. मात्र, या तरूणांनी नवीनच तत्वज्ञान आपणाला शिकवले. मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा अन् विचारायचा, अंकल, आज भी मारोगे? ह्या पिढीने सांगितले की, दहशत संपवायची असेल, तर ती हास्य-विनोदाने संपवून टाका.

या पोरांनी हास्य-विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली. २०१४ साली आपल्याला व्हॉट्सॲप माहित नव्हते, फक्त बीजेपीला माहित होता. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सॲपवर फिरवलं. २०२६ ला अख्खं राजकारण व्हॉट्सॲप विरुद्ध इन्स्टावर आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसली आहेत, की त्यांनी व्हॉट्सॲपवाल्यांची दादगिरी संपुष्टात आली. ज्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते; त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होते आणि त्याच शिक्षणाचा आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळे तरूण पिढी लढण्यास सज्ज झाली. या पुढे “जय भीम” हाच शब्द नमस्कार आणि हॅलो ऐवजी वापरला जाणार आहे. यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मनोज प्रधान यांचे प्रचंड कौतूक केले.

” मनोज प्रधान हे कार्यकर्त्यांमधले बापमाणूस आहेत. कार्यकर्ते कसे गोळा करायचे; संघटना कशी वाढवायची, याची कौशल्य त्यांच्याएवढे कोणाकडेच नाही. 1987 पासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. पण, मनोज प्रधान हे कार्यकर्ते गोळा करणारे लोहचुंबक आहेत. त्यांच्याप्रमाणे गोड शब्दात संवाद साधणे आपणालाही जमत नाही,” असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान मनोज प्रधान यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या 12 वर्षांमध्ये आपल्याला असे वाटू लागले होते की, आपण रस्त्यावर उतरू शकत नाही, आपण भाजपवर टीका करू शकत नाही. ‘झेन् झी’ हा जो शब्द आहे ना, त्यांनी दाखवून दिलंय की हे सगळं खोटं आहे. म्हणजे आपल्या वयाची लोकं घाबरतात, पण ती ‘झेन् झी’ घाबरत नाही आणि ‘झेन् झी’ जर रस्त्यावर उतरली, सोशल मीडिया घेऊन चालली, तर काय होतं, खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिलंय. काळ बदलतोय, वारा बदललाय, त्या वार्‍याचा फायदा घ्यायला शिका. परत परत मी सांगतो, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. पक्षाने मला काय दिलं? पक्ष काय देणार? पक्ष माझ्यासाठी काय करतो? असा प्रश्न जेव्हा केला जातो तेव्हा तुम्ही पक्षासाठी काय करता, याचाही तुम्ही विचार करा. मी 25 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण तुम्ही किती लोकं जोडली त्या पक्षासाठी? आजही तुम्ही एकटेच आहात आणि 25 वर्षांपूर्वी पण तुम्ही एकटेच येत होते. तर असं करू नका. रोज येताना दोन-तीन दोन-तीन कार्यकर्ते वाढवायचा प्रयत्न करा. मी काही काळ राजकारणापासून अलिप्त झालो होतो.

मी राजकारणात परत आलो असेल, तर फक्त डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच! एका कार्यकर्त्यासाठी भांडणारा माणूस, गाडीसमोर झोपणार माणूस, रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये थांबणारा माणूस, महाराष्ट्रात जर कोणी असेल, तर तो एकमेव डाॅ.जितेंद्र आव्हाड हेच आहेत. जनतेच्या समस्यांचा वाली, कार्यकर्ता तुमच्या दारी. आणि लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा वाली, तुमचा भाऊ तुमच्या दारी. हे अभियान ठाण्यात सुरू करण्यात येणार आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसापासून सुरूवातीला पाच प्रभागमध्ये आम्ही चाळीस-पन्नास कार्यकर्ते घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. लोकांनी कार्यालय शोधून न येता आपण लोकांपर्यंत जाऊ, हाच मफलर घालून पक्षाचा झेंडा घेऊन जाऊ. आपल्याला पुढच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 12 वरून 50 वर पोहोचायचं आहे, असा आशावादही मनोज प्रधान यांनी व्यक्त केला.

या वेळी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत, प्रकाश बर्डे, युवक प्रदेश सरचिटणीस नताशाताई आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दिपाली भगत, मर्जिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर आदींची भाषणे झाली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *