पुण्यात एफडीएची मोठी धडक; ४५.५० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त भेसळीचा संशय, पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; कराडमध्ये कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश!
पुणे महाराष्ट्र

पुण्यात एफडीएची मोठी धडक; ४५.५० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त भेसळीचा संशय, पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; कराडमध्ये कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश!

Jul 29, 2026

पुणे, दि. २९ : अन्नपदार्थांतील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल ४५ लाख ५० हजार ७६७ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील विविध आस्थापनांवर छापे टाकून निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, अपूर्ण लेबलिंग आणि नियमबाह्य साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

गणेश पेठेतील वर्धमान एंटरप्रायझेस येथून अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा ७ लाख ८२ हजार ९३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर न्यू पांडियन एंटरप्रायझेस येथून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा ५८ हजार ६२० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला.भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळील माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामातून सर्वाधिक ३६ लाख ३९ हजार ३८० रुपयांचा सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोलचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान या ठिकाणी अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना अथवा नोंदणी नसल्याचे उघड झाल्याने एफडीएने गंभीर दखल घेतली.

नाना पेठेतील गोयल सेल्स कॉर्पोरेशन येथून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा ६९ हजार ८३५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच विजय लक्ष्मी ट्रेडर्स येथून ‘०’ नंबर शेव आणि फरसाणाचाही साठा जप्त करण्यात आला.दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हॉटेल, रेस्टॉरंट आणि कँटीनचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. साताऱ्यातील न्यू सम्राट हॉटेल, हॉटेल केशर आणि हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, तसेच सांगलीतील मैत्री चायनीज सेंटर आणि हॉटेल २५२० गावरान तडका यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

याच कारवाईदरम्यान सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृत्रिम दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एफडीएने येथे ५ लिटर म्हशीचे दूध आणि भेसळीसाठी वापरले जाणारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त केले असून, संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एफडीएच्या या सलग कारवाईमुळे भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *