भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!
ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत धोकादायक असल्याचे घोषित करत रहिवाशांना ती तातडीने रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.शनिवारी दुपारी सुमारे ३.५१ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे महापालिकेला मिळाली.
माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.तळमजला अधिक पाच मजली असलेली ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी असून महापालिकेच्या वर्गीकरणानुसार ती सी-१ प्रवर्गातील, म्हणजेच अत्यंत धोकादायक इमारत आहे. स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत काही कॉलमला तडे गेल्याचे आढळून आले. त्यामुळे इमारतीच्या उर्वरित भागाच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. धूम अपार्टमेंटमध्ये एकूण ४२ सदनिका असून त्यापैकी २२ सदनिकांमध्ये सध्या सुमारे १६० ते १७० रहिवासी वास्तव्यास आहेत.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.घटनास्थळी सहाय्यक आयुक्त विजय कावळे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मुंब्रा प्रभाग समितीने संबंधित रहिवाशांना तातडीने इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या असून पुढील कारवाई बांधकाम विभाग आणि प्रभाग समितीकडून करण्यात येणार आहे. आता रहिवासी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वेळेत स्थलांतर करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
