Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!
Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं चालणार नाही,” अशा थेट आणि आक्रमक शब्दांत वाळेकर यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले. तसेच अंबरनाथ नगरपालिकेत भाजपसोबत सत्तेत असलो तरी चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना केले.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना अरविंद वाळेकर यांनी गृहनिर्माण प्रकल्पांवरून आमदारांना घेरले. आमदारांकडून २०११ चा जीआर दाखवून झोपडवासीयांची दिशाभूल केली जाते आणि भूलथापा मारल्या जातात. हाऊसिंग बोर्डाच्या प्रकल्पाला 15 वर्षे झाली, तरीही नागरिकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. पुढच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांनी यावर आवाज उठवावा; त्यांनी तसे केले तर त्यांचा सत्कार मी स्वतः करेन,” असा टोला वाळेकर यांनी लगावला.पुढे बोलताना त्यांनी, “मात्र 15 वर्षे झाली लोकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत, त्यामुळे आमदार नेमकं काम काय करतात? तर फक्त संध्याकाळी जाऊन फार्म हाऊसवर बसायचं,” अशा शब्दांत आमदार बालाजी किणीकर यांच्यावर निशाणा साधला.
अंबरनाथ नगरपालिकेत पक्षाच्या वरिष्ठांमुळे एकत्रित आलेल्या भाजप आणि शिवसेनेत अद्यापही अंतर्गत संघर्ष कायम असल्याचे वाळेकर यांच्या विधानावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवताना वाळेकर म्हणाले, “नगरपालिकेत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवले पाहिजे. आपला गटनेता, आपले नगरसेवक यावर कोणीही बोलत नाही.” तसेच अंबरनाथ नगरपालिकेतील चुकीच्या कारभाराविरोधात वेळ पडल्यास थेट मोर्चा काढण्याचा इशाराही शिवसेनेच्या या बैठकीतून शहरप्रमुखांनी दिला आहे.
