रायगडातही उभारणार भव्य पत्रकार भवन; पत्रकार धम्मशील सावंत यांची थेट महसूलमंत्र्यांकडे मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सकारात्मक घोषणा,पत्रकारांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद!
रायगड दि०४ : रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त पत्रकार भवन मिळावे, या महत्त्वपूर्ण मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष धम्मशील सावंत यांनी अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात हा विषय थेट महसूलमंत्र्यांसमोर मांडला. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या जागी पत्रकार भवन उभे राहण्याच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला, इतकेच नव्हे तर त्यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिकारी यांना याबाबत आवश्यक त्या सूचना देत पत्रकारांच्या सहाय्याने प्रस्ताव तयार करण्याबाबत ही सूचित केले.
पत्रकारांच्या अडचणी, वाढती कामाची व्याप्ती आणि जिल्ह्यात स्वतंत्र पत्रकार भवनाची गरज याबाबत सविस्तर मांडणी करताना धम्मशील सावंत यांनी मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर रायगडातही आधुनिक पत्रकार भवन उभारण्याची मागणी केली.यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेत “जागा उपलब्ध करून देतो, प्रस्ताव सादर करा. मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर रायगडातही पत्रकार भवन उभारण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही केली जाईल,” असे आश्वासन दिले. याचवेळी त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना याबाबत आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.पत्रकार भवनाचे होणारे प्रमुख फायदे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी कायमस्वरूपी हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल.पत्रकार परिषद, बैठका, प्रशिक्षण कार्यशाळा आणि चर्चासत्रांसाठी स्वतंत्र सभागृह मिळेल.ग्रामीण व तालुकास्तरीय पत्रकारांना कामासाठी केंद्रस्थानी सुविधा उपलब्ध होतील.डिजिटल मीडिया, संपादन, इंटरनेट व माहिती केंद्रासारख्या आधुनिक सुविधा विकसित करता येतील.पत्रकार संघटनांमध्ये समन्वय वाढून पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करता येईल.पत्रकारांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकटी मिळेल.दरम्यान महसूल मंत्र्यांनी दिलेल्या या सकारात्मक आश्वासनामुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच पत्रकार भवनाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
