विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली विरोधकांचे राजकीय नाट्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; विविध विषयांवर तासभर चर्चा….गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकारण!
न्यूज राजकारण

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली विरोधकांचे राजकीय नाट्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; विविध विषयांवर तासभर चर्चा….गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकारण!

Aug 7, 2026

नवी दिल्ली ०७: दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विषय आता संपलेला असताना त्याच आंदोलनाचा आधार घेत काँग्रेस आणि विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधकांकडून केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार ज्योती वाघमारे आणि खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.दरम्यान, शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेल्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी चहापानासाठी आमंत्रित केले होते.

यावेळी मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, काळजी करण्याची गरज नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार संसदेत प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक सभागृहात चर्चा करण्याऐवजी संसदेबाहेर आंदोलन करून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे आंदोलनही संपले असून विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त झाले आहेत.विद्यार्थी आणि युवा हे देशाचे भविष्य असून त्यांचा सन्मान राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी युवकांशी संवादही साधला.

मात्र काँग्रेस आणि इतर विरोधकांकडून आता गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसला संसदेत चर्चा करायची नाही, तर संसदेबाहेर राजीनाम्याच्या मागणीच्या माध्यमातून राजकीय वातावरण निर्माण करायचे आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.नक्षलवादाविरोधातील निर्णायक कारवाई, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच काँग्रेस अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.गृहमंत्री अमित शाह यांना देशभक्तीचे धडे देण्याची गरज नाही. राजकीय स्टंटबाजी करण्याऐवजी विरोधकांनी संसदेत उपस्थित राहून सरकारशी चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे, असे आवाहनही त्यांनी केले.महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यायला हवा. मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज असून या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली :

उपमुख्यमंत्री शिंदेंचा उबाठावर निशाणाशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. न्यायालयावर विश्वास आहे की नाही, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असा टोला त्यांनी लगावला.यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी पेढे वाटले जात होते आणि महायुतीचे सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा केला जात होता. मात्र महायुतीचे सरकार कायद्याच्या चौकटीत स्थापन झाले होते. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही सरकार घटनाबाह्य नसल्याचे स्पष्ट केले होते, असे शिंदे यांनी सांगितले.”जी कॅसेट ते आधी वाजवत होते, तीच कॅसेट आज पुन्हा वाजवली जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी उबाठावर टीका केली.त्या सरकारचा आणि आमदारांचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे.

त्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारे नेमके कुठल्या काळात वावरतात, असा सवालही त्यांनी केला.जनतेच्या न्यायालयात न्याय मागू, असे सांगणाऱ्यांना जनतेने निवडणुकीत उत्तर दिले. जनतेने आम्हाला स्वीकारले. शिवसेनेचे ४० आमदार होते, त्यांची संख्या ६० झाली. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि न्यायव्यवस्थेवरही आमचा पूर्ण विश्वास आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *