१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!
ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड येथील बुद्ध फुले रहिवासी पुनर्वसन प्रकल्प गेली १९ वर्षे रखडवून विकासकाने हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. याबाबत बोलताना श्री.केळकर यांनी सोमवारी एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.
विकासकाला योजना राबविणे शक्य नसेल तर त्या जागी दुसरा सक्षम विकासक आणून प्रकल्प मार्गी लावू आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरबावडी येथे गाळेधारकांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. गेली ५० वर्षे येथे सुमारे २५ गाळेधारक व्यवसाय करत आहेत. मात्र अचानक त्यांना आदिवासी जमीन असल्याचे कारण सांगत नोटीसा बजावण्यात आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गेली अनेक वर्षे हे गाळेधारक असताना आताच त्यांना हटविण्याचे प्रयोजन काय? आदिवासींना पूढे करून एखादा विकासक पुढे रेटण्याचा डाव आहे का? असे प्रश्न श्री.केळकर यांनी उपस्थित केले.
या प्रकरणी गाळेधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील समस्या मांडल्या. श्री.केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार निवासी इमारतींची दुरुस्ती एका आठवड्यात सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले तर वायफाय जोडणीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे ठराव मंजूर होऊनही या निवासी डॉक्टरांची मार्चपासून थकबाकी आहे. ही थकबाकी देखील एक आठवड्यात देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.
भुतम् भयम् या मराठी चित्रपटाच्या टीमने देखील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजेरी लावत मॉलमध्ये प्रदर्शनासाठी प्राईम टाइम मिळण्याची विनंती केली. आमदार संजय केळकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला असून दोन मॉलमध्ये प्राईम टाइम देण्यात आला आहे तर इतर मॉलना देखील त्याबाबतचे पत्र देणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले!
