पुणे: लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुण्याच्या दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वीच दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लगेचच घडलेल्या अमित शाह व सुनेत्रा पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महायुतीची धोरणे यावर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय, अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध विकासप्रकल्पांना गती मिळावी, अशी आग्रही मागणी सुनेत्रा पवार यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचा किती दावा?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याचे संकेत मिळत असून, महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत: शिवसेना (एकनाथ शिंदे गट): २ केंद्रीय मंत्री आणि १ राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १ कॅबिनेट मंत्री पदाची आग्रही मागणी. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री पद ऑफर करण्यात आले होते, मात्र कॅबिनेट पदासाठी राष्ट्रवादीने ते नाकारले होते.
राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागणार?
राष्ट्रवादीच्या वाट्याला जर कॅबिनेट पद आले, तर कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेत सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत, तर राज्यसभेत प्रफुल पटेल आणि पार्थ पवार हे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
