वसई, ०१ :पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी पाठपुरावा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस कृती आराखडा निश्चित करणारी ही बैठक उद्योगासाठी मैलाचा दगड ठरली.बैठकीच्या प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर* यांनी उद्योगासमोरील विविध समस्या, शासनाकडे सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेली बैठक आणि त्यानंतर महसूल व पर्यावरण विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेची सविस्तर माहिती सभासदांना दिली.
उद्योगाला न्याय मिळावा, शासनाशी समन्वयातून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील खाण उद्योगाला शाश्वत दिशा मिळावी, यासाठी असोसिएशन रचनात्मक पद्धतीने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजकांनी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी, व्यवसायातील सुधारणा, रॉयल्टी, पर्यावरणीय मंजुरी, खाण परवाने, प्रशासनाशी प्रभावी समन्वय तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अनेक विधायक सूचना मांडल्या. या सर्व सूचनांवर सखोल चर्चा करून भविष्यात प्रभावी पाठपुरावा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.*महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे* तसेच महसूल व पर्यावरण विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उद्योगाच्या विविध प्रश्नांवर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये *आस्थाश्री सस्टेनाबिलिटी फाउंडेशनचे* संस्थापक व संचालक डॉ. सुभाष दळवी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत त्यांनी स्टोन क्रशर व क्वारी उद्योगामध्ये आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांबाबत, शासनाचा महसूल वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उद्योगाला सामाजिक सन्मान व विश्वासार्हता प्राप्त करून देण्यासाठी पारदर्शक व कायदेशीर कार्यपद्धती तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत खाण व्यवस्थापनाबाबतचे सविस्तर निवेदन माननीय मंत्री महोदयांना सादर केले. या दूरदृष्टीपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनने त्यांना या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रित केले होते.आपल्या मार्गदर्शनात डॉ. दळवी यांनी *”संघर्ष नव्हे… संवाद आणि समन्वय”* हा मूलमंत्र देत शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन, संपूर्ण रॉयल्टीची प्रामाणिक भरपाई, पर्यावरणीय अटींची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक गावांचा विकास, युवक व महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने व्यवसाय करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, शासन आणि उद्योग यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास शासनाचा महसूल वाढेल, पर्यावरणाचे संरक्षण होईल, स्थानिक विकासाला गती मिळेल आणि खाण उद्योगाला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त होईल.यावेळी पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनच्या वतीने डॉ. सुभाष दळवी यांचा प्रेमाची शाल देऊन गौरव करण्यात आला.
बैठकीस असोसिएशनचे सचिव अमित मालवी, खजिनदार नील मेहता, कोअर कमिटी सदस्य तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी “कायदेशीरता, पारदर्शकता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास” या चार सूत्रांवर आधारित खाण व्यवसाय करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनच्या सातत्यपूर्ण, सकारात्मक आणि रचनात्मक पाठपुराव्यामुळे केवळ पालघर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा मिळेल, शासनाचा महसूल वाढेल आणि उद्योगाला समाजात अधिक प्रतिष्ठा प्राप्त होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
