कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!
ताज्या बातम्या

कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!

Jul 31, 2026

.

भिवंडी, दि. ३१ : भिवंडीतील नारपोली परिसरातील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एकही क्षण वाया जाऊ नये आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्धपातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी चर्चा करून डावखरे यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे अग्निशमन दल, श्वान पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. *जखमींची रुग्णालयात भेट* यानंतर आमदार डावखरे यांनी भिवंडीतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पांढरे यांच्याशी चर्चा करून जखमींना देण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. उपचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

‘नऊ जीवांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी ’या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना डावखरे म्हणाले की, नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. जखमींना सर्वतोपरी मदत मिळावी आणि मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या सर्व मदत योजनांचा तातडीने लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

कोहिनूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक इमारतींची नियमित तपासणी, वेळेत स्ट्रक्चरल ऑडिट आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे डावखरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “ईश्वर दिवंगत आत्म्यांना सद्गती देवो, त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमी नागरिकांना लवकर बरे होण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *