डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेत हलगर्जी, दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
कल्याण ३१ : डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही कारवाई केली असून, फेरीवाला हटाव पथकातील निष्काळजीपणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कमलाकर सोनावणे आणि रवी बर्वे यांचा समावेश आहे. उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या दोघांची इतर प्रभागात बदली करून त्यांच्याकडे फेरीवाला हटाव मोहिमेची जबाबदारी देण्यात आली होती.
सध्या डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरासह विविध भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. फ प्रभागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, इंदिरा चौक तसेच मानपाडा रस्त्यावरील बेकायदा फेरीवाला बाजार हटविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.मात्र ग प्रभागातील डॉ. रा. रा. पाटकर रस्ता, कामत मेडिकल गल्ली, उर्सेकरवाडी, भाजी मंडई, रामनगर रेल्वे स्थानक परिसर, वाहतूक कार्यालय आणि राजाजी रस्ता येथे अजूनही फेरीवाल्यांचा अडथळा कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.दरम्यान, फेरीवाला हटाव पथकातील काही कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार येत होत्या.
स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काही कर्मचाऱ्यांचे फेरीवाल्यांशी संगनमत असल्याचे सूचित करणाऱ्या दृश्यचित्रफितीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणात समाधानकारक बाबी आढळून न आल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले!
