Pune १: पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सुरक्षेचे कारण आणि संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधकांना ताब्यात घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे हे अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त आंदोलन करणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक करत स्वारगेट पोलीस चौकीत नेले. या अटकेची कारवाई झाल्यानंतर वसंत मोरे यांनी स्वतः एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.अमित शाह यांच्या या दौऱ्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जाणार असल्यामुळे शहरात आधीपासूनच पोलिसांचा भारी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना घरातून किंवा रात्रीच ताब्यात घेतले होते. असे असतानाही, आज सकाळी प्रत्यक्ष दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या ताफ्यापुढे काळे फुगे सोडून आपल्या निषेधाची नोंद केली. त्यांना काळे झेंडे दाखवण्याऐवजी कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर काळे फुगे सोडले. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील अमित शाह यांचा ताफा येण्यापूर्वीच रस्ता अडवला आणि मार्केट यार चौकात जोरदार निदर्शने करत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली, त्यानंतर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.दुसरीकडे, या सर्व राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आंदोलनादरम्यान महर्षी नगर येथील महाराष्ट्र मंडळ मैदानावर एक महत्त्वाचा पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते!
