भारतीय मजदूर संघाशी संलग्न फॉरवर्ड सीफेअरर्स युनियनच्या नूतन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन….“नाविकांचे वेतन, सामाजिक सुरक्षा, नियमित रोजगार आणि न्यायासाठी देशव्यापी लढा तीव्र करण्याचा निर्धार!
मुंबई, दि. २७ ऑगस्ट २०२६ : भारतीय मजदूर संघाशी संलग्न फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला. नामफलकाचे अनावरण आणि फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यासह संघटनेच्या संघर्षमय वाटचालीतील एका नव्या अध्यायाचा शुभारंभ झाला.या सोहळ्याला भारतीय मजदूर संघाचे मा. राष्ट्रीय महामंत्री तथा जेष्ठ नेते श्री. रवींद्र हिमते, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. पवन कुमार, बंदर व गोदी क्षेत्राचे उद्योगप्रभारी श्री. चंद्रकांत (अण्णा) धुमाळ, राष्ट्रीय सचिव तथा विधी प्रकोष्ठप्रमुख अॅड. अनिल ढुमणे, पश्चिम क्षेत्राचे सहसंघटनमंत्री श्री. मोहन येणुरे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगिर, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. सुनील सिंह तसेच भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे महामंत्री श्री. सुरेश पाटील यांच्यासह कामगार आणि सागरी क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, भारतीय मजदूर संघ आज जगातील सर्वांत मोठ्या आणि अग्रगण्य कामगार संघटनांपैकी एक आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न झाल्यानंतर फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाच्या संघर्षाला राष्ट्रीय पातळीवर नवे बळ आणि व्यापक दिशा मिळाली आहे. भारतीय नाविक क्षेत्रात कार्यरत असलेली ही संघटना देशातील प्रमुख आणि मोठ्या युनियनपैकी एक असून, अनेक वर्षांपासून नाविकांचे वेतन, रोजगार, सामाजिक सुरक्षा, सन्मान, न्याय आणि अन्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करीत आहे.स्वागतपर आणि प्रास्ताविक भाषणात बिरवाडकर यांनी फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाचा संघर्षमय इतिहास आणि नाविकांच्या हितासाठी संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अनेक नाविकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी युनियनने सातत्यपूर्ण संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
सोहळ्याला उपस्थित सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते तसेच नाविक बंधू-भगिनींचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन केले.भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. पवन कुमार यांनी मार्गदर्शन करताना अधिकाधिक नाविकांनी युनियनशी जोडले जाऊन संघटित शक्तीच्या बळावर आपले हक्क प्राप्त करावेत, असे आवाहन केले. नाविकांना योग्य वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या नियमित व कायमस्वरूपी रोजगारासाठीही युनियनने प्रभावी संघर्ष उभारला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.नाविकांना वर्षभर रोजगार, सुट्टीच्या काळातही वेतन, भरपगारी रजा तसेच सुट्टी संपल्यानंतर त्याच कंपनीत पुन्हा रुजू होण्याचा आणि नोकरीत सातत्य राखण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. यातून नाविकांना रोजगाराची शाश्वती, आर्थिक सुरक्षितता आणि सन्मानजनक जीवन प्राप्त होईल, असे श्री. पवन कुमार यांनी स्पष्ट केले.
भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय महामंत्री श्री. रवींद्र हिमते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दूरदृष्टीचे स्मरण केले. ज्या शक्तीचे समुद्रावर प्रभुत्व असते, ती शक्ती संपूर्ण जगावर आपला प्रभाव निर्माण करू शकते, असे त्यांनी सांगितले. भारताची आर्थिक प्रगती, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक प्रतिष्ठा यामध्ये सागरी क्षेत्र आणि नाविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नाविकांच्या हितांचे आणि हक्कांचे रक्षण करणे हा केवळ कामगारविषयक प्रश्न नसून राष्ट्रहिताचा विषय आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.भारतीय मजदूर संघाचे सक्षम नेतृत्व, फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाचे प्रभावी तळागाळातील कार्य आणि कार्यकर्त्यांच्या समर्पित संघर्षाच्या बळावर ही संघटना आगामी काळात नाविकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या आणि प्रभावशाली युनियनमध्ये आपले स्थान निर्माण करेल, असा विश्वास श्री. हिमते यांनी व्यक्त केला.
हे नूतन कार्यालय हजारो नाविकांसाठी आशा, विश्वास आणि न्यायाचे केंद्र बनेल. नाविकांना येथे आपल्या समस्या मांडता येतील आणि कायदेशीर हक्कांच्या प्राप्तीसाठी संघटनेचे सहकार्य घेता येईल, असे त्यांनी सांगितले. युनियनच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण मेहनत, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि संवेदनशीलतेने नाविकांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.नाविकांच्या हक्कांच्या लढ्यात फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाला भारतीय मजदूर संघाच्या सहकार्याची जेथे आवश्यकता भासेल, तेथे भारतीय मजदूर संघ संपूर्ण ताकदीने युनियनच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही श्री. हिमते यांनी दिली. नाविकांशी संबंधित प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार तसेच अन्य सक्षम प्राधिकरणांसमोर मांडण्यासाठी आणि त्यावर न्याय्य तोडगा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात भारतीय मजदूर संघ सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात उपस्थित श्री. चंद्रकांत (अण्णा) धुमाळ आणि श्री. किरण मिलगिर यांनीही नाविकांचा रोजगार, वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवाशर्ती आणि सन्मानजनक जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
भारतीय मजदूर संघ आणि फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडिया या दोन्ही संघटना एकत्रितपणे संपूर्ण जहाज वाहतूक क्षेत्रात एक मजबूत संघटनात्मक शक्ती म्हणून उदयास येतील तसेच नाविक आणि सागरी कामगारांवर होणारा अन्याय, शोषण आणि हक्कांचे हनन समाप्त करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.नूतन कार्यालयाच्या उद्घाटनामुळे उपस्थित नाविक, कार्यकर्ते आणि युनियनच्या सभासदांमध्ये आनंद, उत्साह आणि नवा आत्मविश्वास दिसून आला. नाविकांचे हक्क, न्याय, सामाजिक सुरक्षा आणि नियमित रोजगारासाठी एकजुटीने निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करीत सोहळ्याची सांगता झाली!
