Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातात फॉर्च्युनरमधील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. गाडीतील इतर तिघे जण सुदैवाने वाचले आहेत.
हे सर्व पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील रहिवासी असून, रात्री सुमारे दीड वाजता ते मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना मिसिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाला.घटना घडताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे पथक आणि देवदूत बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवून जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने जुन्या मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, मिसिंग लिंकवर यापूर्वीही लहान-मोठे अपघात झाले आहेत, मात्र या मार्गावर अपघातात कोणाचा तरी बळी जाण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे!
