मुंबई ०४ : मुंबईतील बीएमसीच्या एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणांतच दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला.या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा वाद महापालिकेच्या एका टेंडरच्या कारणावरून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हल्ल्यात एका व्यक्तीच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला, तर दुसऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नेमका वाद कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
