ठाणे स्टेशनवर धक्कादायक प्रकार: कॅन्टीनमधील टोमॅटोवर उंदरांचा ताव,प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!
अन्न सुरक्षा ठाणे

ठाणे स्टेशनवर धक्कादायक प्रकार: कॅन्टीनमधील टोमॅटोवर उंदरांचा ताव,प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

Jul 31, 2026

ठाणे ३१ : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर असलेल्या अधिकृत ‘ओरिजिन’ उपहारगृहाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साठवून ठेवलेल्या टोमॅटोवर उंदीर मोकळेपणाने वावरताना आणि ते कुरतडताना स्पष्ट दिसत आहेत. दैनंदिन प्रवाशांच्या आरोग्याशी होणाऱ्या या गंभीर खेळावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.सततच्या तक्रारींनंतर DRUCC चे सदस्य संजीव कुलकर्णी आणि शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी या उपहारगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान कॅन्टीनमध्ये मुदत संपलेली शीतपेये, किडलेला भाजीपाला आणि वारंवार वापरलेले खाद्यतेल विक्रीसाठी ठेवल्याचे उघडकीस आले. तसेच स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती, ज्यामुळे अन्नसुरक्षा नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले.दररोज हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *