Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!
आरोग्य न्यूज

Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!

Aug 6, 2026

कल्याण ०५ : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई मुलाच्या कमरेतच अडकून राहिल्याचे एक्स-रे तपासणीत उघड झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे यांच्या अडीच वर्षांच्या कावेश या मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. उपचारासाठी त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले.

इंजेक्शननंतर सुई तुटल्याचा संशय मुलाच्या आईने व्यक्त केला. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुई खाली पडली असावी, असे सांगत मुलाला घरी पाठवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.घरी परतल्यानंतर मुलाच्या कमरेत तीव्र वेदना सुरू झाल्याने पालकांनी त्याला पुढील उपचारासाठी नेले. खासगी रुग्णालयात एक्स-रे केल्यानंतर मुलाच्या शरीरात इंजेक्शनची तुटलेली सुई असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून ती बाहेर काढण्यात आली.या घटनेनंतर पालकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी अमित कोलेकर यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन किंवा केडीएमसीकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *