विक्रोळी ०५ : मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील पार्कसाईट परिसरात घरगुती वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप रक्तरंजित हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी सुनील विश्वकर्मा (40) यांनी पहाटे घरात मोठ्या आवाजात गाणी लावली. यावरून त्यांचे भाऊ सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीत बदलला.
संतापाच्या भरात सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्राने सुनील विश्वकर्मा, त्यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि दोन मुलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात गाणी लावण्यावरून वाद झाल्याचे समोर आले असले, तरी या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे का, याचाही तपास सुरू असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे!
