Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!
गुन्हे न्यूज

Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७ : डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने हा जामीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घालून दिल्या आहेत. जामिनाच्या अटींनुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपी रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार आहे.वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, रमेश म्हात्रे यांचा मुक्काम गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाझरी रिसॉर्टमध्ये असणार आहे.

याशिवाय, सर्व आरोपींना त्यांचे पासपोर्ट कोर्टाकडे जमा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्राबाहेर राहत असताना आठवड्यातून तीन वेळा तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आरोपींसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.हा संपूर्ण खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी कोणत्याही कारणास्तव तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू नये, असे हायकोर्टाने कठोरपणे बजावले आहे. त्याचप्रमाणे, व्हीसीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) हजर राहण्याच्या मागणीवर कोर्टाने “ही व्हीआयपी ट्रीटमेंट आहे का?” असा सवाल उपस्थित केला; मात्र, आरोपी प्रत्यक्ष पोहोचू शकत नसतील तर रीतसर अर्ज करून कधीतरी व्हीसीद्वारे हजेरी लावायला परवानगी देण्यात आली आहे.

या खटल्यात संपूर्ण सुनावणी होईपर्यंत सरकारी वकील न बदलण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.दरम्यान, या प्रकरणातील पीडित डॉक्टर हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत आहेत. त्यामुळे कोर्टातील सुनावणीसाठी हजर राहावे लागल्यास आणि कामावर उपस्थित राहता आले नाही, तर त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही केडीएमसीच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *