ठाणे ७ ऑगस्ट: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मेट्रो प्राधिकरणाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कमीत-कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत-जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, अशा पद्धतीने रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. परिवहन मंत्री तथा ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असून, त्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांना पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत.
ठाणे शहराला विकासाच्या माध्यमातून पुढे नेत असताना उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध महत्त्वाकांक्षी नागरी विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यापैकी केंद्र सरकारकडून निधीसह मंजूर करून घेतलेला ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प हा भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. ठाण्यातील वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहतूक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक वेगवान, सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मेट्रो प्राधिकरणाने बैठकीत सादर केलेल्या मूळ आराखड्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली. वागळे इस्टेट येथून लोकमान्यनगर बस डेपोमार्गे उपवन परिसरात जाणाऱ्या प्रस्तावित मार्गामुळे लोकमान्यनगरमधील सुमारे १,५०० कुटुंबे बाधित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच उपवन येथील एअर फोर्स शूटिंग रेंजलगत असलेल्या उपवन इंडस्ट्रीजचाही काही भाग प्रभावित होणार असून, ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता त्यांनी बैठकीत मांडली.
याशिवाय वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, रूणवाल प्लाझा परिसर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक १ व २, वेदांत कॉम्प्लेक्स, दोस्ती कॉम्प्लेक्स, समतानगर, लक्ष्मीनगर-चिरागनगर, वर्तकनगर-भीमनगर तसेच शास्त्रीनगर व शिवाईनगरच्या काही भागातील सुमारे एक लाख नागरिकांना या मेट्रो मार्गाचा कोणताही लाभ मिळणार नाही, ही गंभीर बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. उलट ज्या उपवन परिसरातून मेट्रो नेण्याचा प्रस्ताव होता, त्या भागात एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला उपवन तलाव असल्यामुळे भविष्यातही तेथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे तीन वेळा नगरसेवक आणि चार वेळा आमदार म्हणून या परिसराचा सखोल अभ्यास असल्याने मेट्रोचा आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली असती तर अधिक लोकाभिमुख पर्याय उपलब्ध झाला असता, असेही सरनाईक यांनी बैठकीत सांगितले. त्यांनी वागळे इस्टेट – लोकमान्यनगर बस डेपो – आई माता मंदिर – रूणवाल प्लाझा – वेदांत – आचार्य अत्रे मार्ग – वर्तकनगर – पोखरण रोड क्रमांक १ – देवदया पार्क – पोखरण रोड क्रमांक २ असा पर्यायी मार्ग सुचविला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग विकसित केल्यास मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता वाढेल, मोठ्या प्रमाणावरील विस्थापन टळेल, कमी रुंदीकरणात सरळ व सोपा मार्ग उपलब्ध होईल आणि हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल,असे त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी गांभीर्याने दखल घेत, लोकहिताला प्राधान्य देत कमीत-कमी विस्थापन आणि जास्तीत-जास्त नागरिकांना लाभ मिळेल, या तत्त्वावर सुधारित आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश मेट्रो प्राधिकरणाला दिले. त्यामुळे लोकमान्यनगरसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा प्रकल्प ठरला पाहिजे. विकास करताना कमीत-कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत-जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, हीच आमची भूमिका आहे. माझ्या सूचनांची दखल घेऊन लोकहिताला प्राधान्य देत सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश देणारे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या या निर्णयामुळे ओवळा-माजिवडा मतदारसंघासह ठाण्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले!
