Thane: ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी; पालिकेत नवा वाद रंगण्याची शक्यता!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी; पालिकेत नवा वाद रंगण्याची शक्यता!

Aug 13, 2026

ठाणे १३: ठाण्यातील सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार रिंग मेट्रो प्रकल्पावरून ठाणे महापालिकेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. आता या विरोधात अजित पवार गटानेही उडी घेतली असून, नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे नेण्याऐवजी त्याचा फेरविचार करावा आणि तोपर्यंत काम स्थगित ठेवावे, अशी मागणी केली आहे. अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली असून, या सूचनेला शिंदे शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनीही पाठिंबा दिला आहे.या प्रकल्पाची पार्श्वभूमी पाहता, ठाण्याच्या १९९९ च्या मंजूर विकास आराखड्यात सर्वप्रथम एचसीएमटीआर HCMTR आणि एमआरटीएस MRTS मार्गिकेचा प्रस्ताव होता.

त्यानंतर २०१२ आणि २०१४ मध्ये या मार्गिकेची पुनर्रचना करण्यात आली. मात्र, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या व्यावसायिक, औद्योगिक व निवासी इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. तसेच, पूर्वी सुमारे ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आता थेट १२,२०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहराभोवती मेट्रोचे जाळे पसरलेले असताना या नव्या मार्गिकेची खरीच गरज आहे का, तिची आर्थिक व्यवहार्यता काय आहे आणि या निधीचा वापर टीएमटी बससेवा व वाहतूक सुधारण्यासाठी करता येईल का, याचा अभ्यास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करता, प्रकल्पाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ, पदाधिकारी व विविध पक्षनेत्यांची एक उपसमिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समितीला ४५ ते ६० दिवसांत आपला अभ्यास अहवाल सादर करण्याची मुदत द्यावी आणि हा अहवाल अंतिम निर्णयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवावा, असा प्रस्ताव या लक्षवेधी सूचनेद्वारे मांडण्यात आला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *